रेल्वेची फुकट्या प्रवाशांविरोधात मोहिम : 601 प्रवाशांकडून चार लाख 30 हजारांचा दंड जागेवर वसुल
भुसावळ विभागातील आठ प्रमुख स्थानकांवर रेल्वेचे विशेष तिकीट तपासणी अभियान
Railways’ campaign against idle passengers : Fine of Rs 4.30 lakh recovered from 601 passengers on the spot भुसावळ (10 एप्रिल 2026) : उन्हाळी सुट्या तसेच हंगामामुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहून काही प्रवासी विनातिकीट तर काही जनरल तिकीटावरून रिझर्व्ह डब्यातून प्रवास करीत असल्याने अन्य प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. प्रवाशांचा प्रवास सुलभ व आरामदायक होण्यासाठी व फुकट्या प्रवाशांना चाप बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ स्थानकांवर 8 रोजी फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान राबवले. तब्बल 601 प्रवाशांकडून चार लाख 30 हजारांचा दंड वसुल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या स्थानकावर राबवले अभियान
या विशेष अभियानांतर्गत विभागातील भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती या स्थानकावर विशेष अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रवाशांना नियमांचे पालन करून वैध तिकीटासह प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा होता.

601 प्रकरणात कारवाई
या अभियानात एकूण 60 तिकीट तपासणी कर्मचारी 9 रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले. अभियानादरम्यान एकूण 601 प्रकरणांमध्ये कारवाई करून चार लाख 30 हजार 330 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145इ व 167 अंतर्गत एकूण 17 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून अडीच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
अनधिकृत विक्रेतेही रडारवर
रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या 12 विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर नियमानुसार प्रकरणे दाखल करण्यात आली.

