नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : भाजीपाल्याआड होणारी प्राण्यांची तस्करी रोखली
कोल्हा, पोपटसह तितूर प्रजातीचे पक्षी जप्त : मालेगावातील त्रिकूट जाळ्यात
Major Operation by Nandurbar Crime Branch: Animal Smuggling Concealed Beneath Vegetables Foiled नंदुरबार (14 एप्रिल 2026) : नंदुरबार गुन्हे शाखेने भाजीपाल्याआड ‘पुष्पा स्टाईल’ होणारी प्राण्यांची वाहतूक रोखत मालेगावातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून कोल्हा, पोपट तसेच तितूर प्रजातीचे पक्षी जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 40 हजार रुपये आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे-सुरत महामार्गावरून सोमवार, 13 एप्रिल रोजी एका वाहनातून वन्यजीव प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी केले. संशयास्पद वाहन क्रमांक (एम.एच.41 ए.यू.2352) अडवून त्याची झडती घेतल्यानंतर यार वाहनामध्ये भाजीपाला कॅरेटच्या आड प्राणी व पक्षी आढळले.


त्रिकूटाला बेड्या
यावेळी पथकाने शहजाद अहमद अतिक अहमद (47, रा.अब्दुल नगर मालेगाव), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (32, रा.पज्तन चौक, मालेगाव) व शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (24, रा.गुलाब पार्क, मालेगाव) यांना अटक करण्यात आली. संशयीतांनी मालेगाव येथील काही व्यक्तींनी वन्यजीव प्राणी व पक्षी गुजरात राज्यातील वडोदरा येथे वाहतूक करण्यासाठी दिल्याची कबुली दिली आहे.
वन्यप्राणी वनविभागाच्या ताब्यात
पोलिसांनी वाहनातून पाच कोल्हा जातीचे प्राणी, 99 हिरव्या रंगाचे लाल चोच असलेले (अॅलेक्झाड्रीन) जातीचे पोपट व 190 तितर जातीचे पक्षीसह वाहन मिळून 23 लाख 40 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. वन्यप्राण्यांना सुस्थितीत वनविभागाचे ताब्यात देण्यात आले व आरोपींविरोधात विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, राकेश वसावे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक, सचिन वसावे, जितु पाडवी, जितेंद्र तोरवणे, अभय राजपुत आदींच्या पथकाने केली.








