बाबासाहेबांच्या जयघोषाने निनादले भुसावळ शहर
जयंती उत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकांनी वेधले लक्ष : अभिवादनााठी दिवसभर अलोट गर्दी
The city of Bhusawal reverberated with chants hailing Babasaheb भुसावळ (15 एप्रिल 2026) : भारतीय संविधानाचे शिल्पकार व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा जयंतीउत्सवानिमित्त शहरातील विविध भागातून एकूण 37 मिरवणुका शिस्तबद्धरित्या काढण्यात आल्या. डीजेचा दणदणाट व ‘जय भीम’च्या जयघोषाने अवघे शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले.
दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
सोमवारी मध्यरात्री 12 वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरून अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे पालिकेपुढील पुतळा परिसराकडे आले होते. रेल्वे एनआरएमयूतर्फे सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. शहर पोलीस ठाणे हद्दीत 23 तर बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत 14 मिरवणुका निघाल्या. पंचशील नगर, गौतम नगर आणि यशोधरा नगरातील मंडळांनी चित्ररथ साकारले.

सजीव देखाव्यावर भर
यंदाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील संघर्ष आणि कार्यावर आधारित ‘सजीव देखावे’ होते. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. विशेष म्हणजे, मिरवणुकीत महिला आणि युुवतींचा सहभाग लक्षणीय होता.
मुख्य चौकात स्क्रीनवर प्रक्षेपण
शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर मुख्य चौकात मोठ्या एलईडी स्क्रीनवर महामानवाच्या पुतळा परिसरातील कार्यक्रमांचे यंदा थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरवर असलेल्या नागरिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारीत गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
बसस्थानक आजपासून पूर्ववत
मिरवणुकीची गर्दी लक्षात घेता खबरदारी म्हणून रविवारी मुख्य बसस्थानक पंधराबंगला भागातील एसटी डेपोत हलवण्यात आले होते.जळगाव, यावल, रावेर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या बसेस या डेपोमधूनच सोडण्यात आल्या. बुधवारपासून बसस्थानकाचे कामकाज पुन्हा मूळ जागेवरून सुरू झाले आहे.









