भुसावळात खाकीतील ‘शिलेदारांचा गौरव’
‘Honoring the Warriors’ in Khaki at Bhusawal भुसावळ (15 एप्रिल 2026) : पोलीस स्टेशन ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ या संकल्पनेनुसार भुसावळ विभागातील विशेष कामगिरी करणार्या पाच कर्मचार्यांचा पोलीस उपअधीक्षकांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
अशी आहे संकल्पना
शहरातील तिन्ही पोलीस ठाणे, वाहतूक शाखा व विभागातील नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात उत्कृष्ठ काम करणार्या कर्मचार्यांचा दरमहा गौरव होतो. जे कर्मचारी उत्कृष्ठ कामे करतात, या कर्मचार्यांना रोख रक्कमेसह प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. दर महिन्यात भुसावळ डीवायएसपी कार्यालयात होत असलेल्या क्राईम मिटींगमध्ये या कर्मचार्यांना सन्मानित केले जाते. प्रत्येक कर्मचार्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. त्याच आधारे त्यांचा गौरव केला जातो.

यांची होती उपस्थिती
यावेळी डीवायएसपी केदार बोरबोले, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबाद सहायक निरीक्षक योगीता नारखेडे, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांच्यासह 52 पोलीस अंमलदार उपस्थित होते.
या कर्मचार्यांचा झाला सन्मान
भुसावळ शहरचे राहुल भोई यांनी यांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील माल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली तर बाजारपेठचे सहायक फौजदार चंद्रशेखर गाडगीळ यांनी सण,उत्सव आणि निवडणुकांमध्ये वाहन चालक म्हणून उत्कृष्ट कर्तव्य पार पाडले. भुसावळ तालुक्याचे सुधीर विसपुते यांनी ‘ऑपरेशन शोध’ अंतर्गत 17 पैकी 10 बेपत्ता महिलांचा शोध लावला. नशिराबादचे गुणवंत देशमुख यांनी लोकन्यायालयांतर्गत 38 केसेस निकाली काढल्या तर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी राहुल भंडारे अपहृत मुलीचा शोध आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न चोख हाताळले.
गुन्हे शोध पथकांचाही विशेष गौरव
केवळ ’टॉप कॉप’च नव्हे, तर महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणणार्या पथकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यातील योगेश माळी, ज्यांनी अज्ञात वाहनाचा शोध लावला, तसेच नशिराबाद पोलीस ठाण्यातील कमलाकर बागुल आणि राजेश मेंढे यांच्या पथकाने गावठी कट्ट्यासह पसार संशयीताला अटक केली.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीचा माल हस्तगत करणार्या विजय नेरकर आणि त्यांच्या पथकालाही सन्मानित करण्यात आले.









