मुक्ताईनगरात जेरबंद बिबट्याची जंगलात रवानगी
वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर सातपुड्याच्या वनक्षेत्रात रवाना
Leopard Captured in Muktainagar Relocated to the Forest मुक्ताईनगर (16 एप्रिल 2026) : शहरात मादी बिबट्याला मोठ्या कसरतीनंतर रविवारी ताब्यात घेतल्यानंतर आता सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले. त्याआधी त्याला 48 तास पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवत आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याला कुठेही दुखापत नव्हती. पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले.
मादी बिबट्या सुसाट जंगलात
वनविभागाने बिबट्याला पिंजर्यातून एका वाहनाद्वारे सातपुडा वनक्षेत्रात नेले. तेथे हळूवारपणे पिंजरा उघडण्यात आला. डोळ्यासमोर वनक्षेत्र दिसल्यानंतर बिबट्याने सुरुवातीला पिंजर्यामागच्या भागात वावर केला. त्यानंतर पिंजर्याच्या दाराशी आल्यानंतर चौफेर नजर टाकली आणि एकांत असल्याची जाणीव झाल्यानंतर बिबट्या मोठ्या ऐटीत वाहनाखाली उतरला आणि मोबाइल टॉवरच्या ओट्यावर चढून तो क्षणातच पसार झाला. मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृहातील आडोशाला ही मादी बिबट लपलेली आढळून आली.



