भुसावळ विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


भुसावळ (19 एप्रिल 2026) : जागतिक वारसा दिनानिमित्त भुसावळ रेल्वे विभागात विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार, 18 एप्रिल 2026 पासून आठवडाभर चालणार्‍या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची थीम संघर्ष व आपत्तींच्या संदर्भात जिवंत वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद अशी आहे.

या उपक्रमांची सुरुवात शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ येथे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेने झाली. या स्पर्धेत तब्बल 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवली. तसेच भुसावळ येथील ऐतिहासिक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय इमारत आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशयोजनेने सजविण्यात आली होती, ज्यामुळे वारशाचे महत्व अधोरेखित झाले.


शनिवार, 18 एप्रिल रोजी ओल्ड स्टीम लोको रोड येथून मूलभूत प्रशिक्षण केंद्रापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सेंट्रल रेल्वे स्कूलचे विद्यार्थी तसेच बीटीसीचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना बीटीसीच्या मॉडेल कक्षात विविध तांत्रिक नमुने दाखवून रेल्वे वारसा व अपघात निवारण प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली.

भुसावळ विभागाच्या यांत्रिक विभागामार्फत आयोजित या सर्व कार्यक्रमांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा असून, आपत्कालीन परिस्थितीत या वारशाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तयारी अधिक सक्षम करणे हाही त्यामागील हेतू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !