भुसावळात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; शाळकरी विद्यार्थ्याचे तोडले लचके ; पालिकेची कारवाईबाबत उदासीनता
Stray Dogs Run Amok in Bhusawal ; School Student Mauled; Municipal Council Indifferent to Taking Action भुसावळ (23 एप्रिल 2026) : भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून शाळकरी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे तर दुसरीकडे कारवाई करण्यासाठी जवाबदार असलेली पालिकेची यंत्रणा उदासीन असल्याने सर्वसामान्य नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
अनेक भागात कुत्र्यांनी तोडले लचके
भुसावळ शहरातील अनेक प्रभागांमध्ये व प्रामुख्याने भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, गणेश कॉलनी, परिसर तसेच विविध भागात सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील आठवड्यात गणेश कॉलनीतील एक वृद्ध नागरिकाला कुत्र्याने चावा घेतला तसेच शुक्रवार, 24 रोजी लहान शाळकरी मुलाला चेहर्यावर चावा घेण्यात आल्याने बालकाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रॅबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतप्त असून पालिकेविरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.

अस्वच्छतेमुळे पोषक वातावरण
गल्ली बोळामध्ये एकत्र येऊन कुत्रे चारचाकी वाहन, दुचाकीस्वार,लहान मुले, मुली वृद्ध नागरिक, महिला यांच्या मागे चावा घेण्यासाठी पळतात. शहराचा वाढता विस्तार रस्त्यांवरील अस्वच्छतेमुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळाले असून त्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
तर मनसेचे आंदोलन
भुसावळ शहरात अशा अनेक भागात घटना घडल्या असून काही नागरिकांना वृद्ध लहान मुले मुलींना चावा घेतल्याचे समोर आले आहे. नगरपालिका प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी व बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसेतर्फे पालिका प्रशासनाला करण्यात आली. निवेदन देतेवेळी भुसावळ मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, तालुका सचिव विलास कोळी, सुशील मोरे उपस्थित होते.
