यावल शहरात बैलगाडा शर्यत उत्साहात
Bullock Cart Race Held with Great Enthusiasm in Yawal City यावल (28 एप्रिल 2026) : यावल शहरात प्रथमच भव्य अशी श्री हनुमान केसरी बैल गाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत ही फैजपूर रस्त्यावर भरवण्यात आली. या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यासह बुलढाणा, मलकापूर येथील तसेच मध्य प्रदेशातील खरगोन येथून देखील बैलगाडा घेऊन शेतकरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले. एकूण 38 बैलगाड्यांनी यात सहभाग घेतला व सायंकाळी पार पडलेल्या या अंतिम फेरीत येथील बैलगाडा हा विजेता ठरला.
शेतकर्यांमध्ये मोठा उत्साह
शहरातील फैजपूर रस्त्यावर श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हे पहिलेच वर्ष होते. खुल्या श्री हनुमान केसरी बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यातील कासोदा, चाळीसगाव, धरणगाव तसेच शेजारील जिल्हा बुलढाणा, मलकापूर सह मध्य प्रदेशातील खरगोन या शहरातून देखील या बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी शेतकरी आले होते. या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्याहस्ते तर बैलगाडा व बैल पूजन नगराध्यक्ष छाया पाटील नगरसेवक अतुल पाटील यांच्याहस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, श्री पवनदासजी महाराज, डॉ.कुंदन फेगडे, बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, नगरसेवक रूबाब तडवी, धीरज महाजन, नारायण चौधरी सह मान्यवरांची उपस्थिती होती. या बैलगाडा शर्यती यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष निलेश गडे, उपाध्यक्ष पंकज येवले, भरत बारी, अश्फाक शेख, पवन धनगर, बाळा कोलते, विजय कोळी यांनी परिश्रम घेतले.
विजेत्यांचा बक्षिसाने गौरव
या बैलगाडा शर्यतीत प्रथम विजेत्या ठरलेल्या येथील बैलगाडा मालकास आमदार अमोल जावळे यांच्यातर्फे 21 हजार रुपयांचे तर द्वितीय बक्षीस बैलगाडा मालकास 11 हजार रुपये आर.डी. पाटील यावल यांच्याकडून तर तृतीय बक्षीस 7 हजार रुपये डॉ.योगेश गडे यांच्याकडून देण्यात आले.
