मध्य रेल्वेची रेकॉर्ड ब्रेक कारवाई : एक लाख फुकट्या प्रवाशांकडून 12.23 कोटींचा दंड वसुल


Central Railway’s Record-Breaking Action : ₹12.23 Crore in Fines Collected from 100,000 Ticketless Passengers भुसावळ (4 मे 2026) : मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेतून विनातिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा, रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने वाणिज्य विभागाने तिकीट तपासणी मोहिमा व्यापक आणि सघन केल्या आहेत. भुसावळ विभागात एप्रिलमध्ये एक लाख 9 हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 12.23 कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली तिकीट तपासणीसांच्या पथकांनी केल्याने फुकट्या प्रवाशांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रेकॉर्डब्रेक कारवाई
ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी.के.सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. भुसावळ विभागात मेल-एक्सप्रेस, प्रवासी व विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे व्यापक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात, यापूर्वी विभागाची सर्वोच्च मासिक कामगिरी मे 2025 मध्ये 11.20 कोटी रुपये नोंदवली गेली होती. आता एप्रिल 2026 मध्ये विभागाने 12.23 कोटी रुपये महसूल उत्पन्नाची नोंद केली आहे.

तिकीट काढूनच प्रवासाचे आवाहन
या यशामागे तिकीट तपासणी मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी, नियोजनबद्ध तपासणी, तसेच प्रवाशांमध्ये नियमांविषयी जनजागृती यांचा मोठा वाटा आहे. अनियमित प्रवासाच्या 44,738 प्रकरणांमधून 2.18 कोटी, विनातिकीट प्रवासाच्या एकूण 63,608 प्रकरणांमधून 6.70 कोटी, एकूण 404 बुक न केलेल्या सामान प्रकरणांमधून 50 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकिट प्रवासाबाबत मध्य रेल्वेची शून्य-सहिष्णुता धोरण कायम आहे. रेल्वे प्रवाशांनी नियमांचे पालन करीत तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !