कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये महिलेची सुरक्षित प्रसुती : नर्स ठरल्या ‘देवदूत’

भुसावळच्या मुख्य तिकीट निरीक्षकाची तत्परता : विवाहितेसह नवजात बालिकेचे प्राण वाचले


Safe Delivery of Woman on Kushinagar Express: Nurses Hailed as ‘Angels’ भुसावळ (16 मे 2026) : एलटीटी ते भुसावळ दरम्यान धावणार्‍या गाडी 22538 कुशीनगर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणार्‍या गर्भवती महिलेला कल्याण सोडल्यानंतर प्रसव वेदना सुरू झाल्या व त्याचवेळी गाडीतील तिकीट निरीक्षकांना याची माहिती कळताच त्यांनी महिलेला कसारा स्थानक येताच महिलेला ए- 1 डब्यात आणले. यावेळी डॉक्टरांची विचारणा करल्यानंतर एका महिलेने नर्स असल्याचे सांगत यावेळी कोचमध्येच महिलेची सुरक्षित प्रसुती केली. तिकीट निरीक्षकाची सतर्कता व वेळीच धावून आलेल्या नर्स महिलेसह बाळासाठी देवदूत ठरल्या.

महिलेची रेल्वेतच प्रसुती
कल्याण स्थानक पार झाल्यानंतर ए/1 कोचजवळील जनरल डब्यात एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षक आर.एस.तेली यांना दिली. जनरल डब्यात मोठी गर्दी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेली यांनी तात्काळ पुढाकार घेत कसारा स्थानक आल्यावर काही प्रवाशांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितपणे ए/1 कोचच्या कॅरी डोअर परिसरात आणले. डब्यात कोणी डॉक्टर आहे का याची विचारणा केली असता, त्याच वेळी त्या डब्यात प्रवास करणार्‍या नर्स पूजा खरगे यांनी मदतीसाठी पुढे येत प्रसूती प्रक्रियेत सहकार्य केले. त्यांच्या मदतीने रेल्वेतच महिलेची सुरक्षित व नैसर्गिक प्रसूती करण्यात आली. महिलेने एका कन्येला जन्म दिला.

घटनेची माहिती तत्काळ मुंबई येथील मुख्य वाणिज्य नियंत्रकांना देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकावर रुग्णवाहिका, स्ट्रेचर, डॉक्टर तसेच अन्य आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या. रेल्वे इगतपुरी स्थानकावर पोहोचल्यानंतर महिला व नवजात बालिकेला पुढील उपचारासाठी ईगतपुरी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेली यांचे कौतुक
या संपूर्ण घटनेत मुख्य तिकीट निरीक्षक आर.एस.तेली यांनी दाखविलेली तत्परता आणि सेवाभावाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याच्या भारतीय रेल्वेच्या बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !