जागतिक डेंग्यू दिनानिमित्त भुसावळ शहरात जनजागृती मोहीम उत्साहात

नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन : शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्टेशन व बाजारपेठेत माहिती पत्रकांचे वाटप ; आरोग्य विभागाचा सक्रिय सहभाग


भुसावळ (17 मे 2026) : जागतिक डेंग्यू दिनानिमित्त भुसावळ शहरात शनिवार, 16 मे रोजी आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांमध्ये डेंग्यू तापाबाबत माहिती पोहोचवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्टेशन तसेच बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी माहितीपत्रकांचे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.

यांचा जनजागृतीसाठी सहभाग
या मोहिमेचे आयोजन जिल्हा परिषद, जळगाव आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.वाय.तडवी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जैन आणि डॉ.तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचार्‍यांनी सक्रिय सहभाग घेतला.

डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या रक्तातील विषाणू डासामार्फत दुसर्‍या निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे संसर्ग वाढतो. हा डास लहान आकाराचा असून काळ्या रंगाचा असतो व त्याच्या पायांवर पांढरे पट्टे असतात, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, स्नायू व सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ, उलट्या तसेच अंगावर गोवरासारखे पुरळ येणे इत्यादी आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ रक्ततपासणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

उपचाराबाबत मार्गदर्शन करताना ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामोलचा वापर करावा, पुरेशी विश्रांती घ्यावी तसेच वेदनाशामक औषधे जसे की स्पिरिन किंवा आयबुप्रोफेन टाळावीत, असे स्पष्ट करण्यात आले. शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी क्षार संजीवनीसारख्या जलपेयांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला.

डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांनी घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामे करून स्वच्छ करावेत, टाक्यांना झाकण लावावे, घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या, डबे यांची विल्हेवाट लावावी, तसेच आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन करण्यात आले. डासप्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणीचा वापर तसेच गटारी व डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचेही सुचविण्यात आले.

या संपूर्ण मोहिमेत भुसावळ शहरातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेऊन नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !