गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा : भुसावळात पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले

भुसावळ उपविभागातील डीबी स्टाफसाठी विशेष कार्यशाळा


Use of Modern Technology Crucial for Solving Crimes : Deputy Superintendent of Police Kedar Barbole in Bhusawal भुसावळ (19 मे 2026) : गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासह क्लिष्ट गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने छडा लावण्यासाठी भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत भुसावळ उपविभाग तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे यावेळी पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.

तपास पद्धत्तीबाबत मार्गदर्शन
सध्याच्या डिजिटल युगात गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.




कार्यशाळेत पोलिसांना आधुनिक तपास पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ह्युमन इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे मानवी गुप्तवार्ता संकलन, सक्षम माहितीदार व सोर्स तयार करण्याच्या पद्धती, घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे अचूक विश्लेषण, तसेच सीडीआर व डम्प डेटाच्या आधारे संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय ‘सी-ट्रेस’ व ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’ च्या माध्यमातून सायबर तपासाची आधुनिक तंत्रे, तसेच मोड्स ऑपेरांडी ब्युरोच्या नोंदींचा वापर करून सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबतही माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेमुळे भुसावळ उपविभागातील गुन्हे शोध पथकाची कार्यक्षमता अधिक वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होईल, असा विश्वास यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी व्यक्त केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !