भुसावळात पेट्रोल पंपांवर इंधनासाठी झुंबड

तीन तासात 9 हजार लिटर डिझेल संपले : डिझेल कॅनमध्ये भरण्यासाठी शेतकर्‍यांची मोठी गर्दी,पोलिस बंदोबस्त तैनात


Crowds at petrol pumps in Bhusawal for fuel भुसावळ (23 मे 2026) : प्रशासनाच्या आदेशानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल विक्री सुरू होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. सकाळी आठ ते सव्वा अकरा या अवघ्या तीन तासांच्या कालावधीत तब्बल 9 हजार लिटर डिझेलची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. तहसील कार्यालयासमोरील पंपावर जणू डीझेल भरण्यासाठी यात्राच भरली होती.

शेतकर्‍यांची मोठी गर्दी
विशेषतः शेतकर्‍यांनी शेतीपंप व कृषी कामांसाठी डिझेल कॅनमध्ये भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.नागरिकांमध्ये इंधन टंचाईची भीती निर्माण झाल्याने अनेकांनी अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांसह प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक, माल वाहतूक करणारे वाहनधारक, कार चालक आदींनी मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयासमोरील पेट्रोल पंपावर गर्दी केली होती, वाढती गर्दी लक्षात घेता, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे यांनी पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.




कॅनमध्ये डिझेल घेणार्‍यांची गर्दी होती. कॅनमध्ये डिझेल मिळावे यासाठी पंपावरील कर्मचार्‍यांशी वाद घालत होते. गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांना शिस्तीत इंधन भरण्याचे आवाहन केले. पेट्रोल पंप चालकांनीही नियमांचे पालन करत इंधन वितरण सुरू ठेवले. दरम्यान,प्रशासनाकडून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लांबच लांब रांगा
भुसावळ तहसील कार्यालयासमोरील पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याची माहिती मिळताच वाहनधारक व कॅन घेऊन ग्राहकांनी पंपावर रांगा लावल्या होत्या. वाहनांच्या रांगा या अर्पण हॉस्पीटलच्या पुढे गेल्या होत्या. कॅनमध्ये डिझेल घेणार्‍यांची अधिक गर्दी झाली होती.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !