किनगावातील सामान्य कुटुंबातील तरुणीची मुंबई पोलीस दलात निवड : ग्रामस्थांनी केला गौरव
यावल (31 मे 2026) : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावातील रहिवासी एका सामान्य कुटुंबातील मुलीची मुंबई पोलीस भरतीत निवड झाली. हातमजुरी करणार्या कुटुंबातील ही मुलगी असून तिने आपल्या जिद्दीवर सदर यश मिळवले आहे. नुकताच मुंबई पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाल्यावर गावात तिचा एक छोटेखानी कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आला.
जिद्द व चिकाटीचे यश
किनगाव खुर्द, ता.यावल येथील रहिवासी अंकुश कोळी यांची मुलगी रोहिणी अंकुश कोळी या मुलीने आपल्या जिद्द, चिकाटीतुन मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवले. नुकत्याच जाहिर झालेल्या निकालात तिची मुंबई पोलीस म्हणून निवड झाली. सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलगी असून कुटुंबात आई-वडील, लहान भाऊ, मोठी बहिण असा तरुणीचा परिवार आहे.
वडीलांना तिने आपल्याला पोलीस व्हायचे असल्याचे तिने सांगितले होते व वडीलांनीदेखील तिला तिच्या स्वप्नपूर्तीकरीता पाठबळ दिले व आज तिने यशाला गवसणी घातली. तरुणीची मुंबई पोलिसात निवड झाल्याबद्दल गल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करीत तिचे कौतुक करीत तिला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
