चित्रकार भागवत सपकाळे यांच्या निसर्ग चित्र प्रदर्शन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद


यावल (31 मे 2026) : खानदेशातील प्रख्यात निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या निसर्ग चित्र प्रदर्शन व निसर्गरंग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. 29 मे रोजी सकाळी जळगाव येथील पु. ना. गाडगीळ, रिंग रोड येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
उद्घाटक म्हणून उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जळगाव एअरपोर्टचे डायरेक्टर हर्ष त्रिपाठी, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.कमलाकर पाटील, अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे उपाध्यक्ष शालिग्राम भिरूड, कोळी समाज बहुउद्देशीय संस्था जळगावचे संपर्कप्रमुख जगन्नाथ टी. बाविस्कर, जळगाव कला अध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
28 मे ते 1 जून दरम्यान पु. ना. गाडगीळ, रिंग रोड, जळगाव येथे भागवत सपकाळे यांच्या निसर्गचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये जलरंग माध्यमातील अप्रतिम निसर्गचित्रांचा आस्वाद रसिकांना घेता येत आहे. जळगाव तालुक्यातील फुपनी या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात भागवत सपकाळे यांचे बालपण गेले. सन 2006 मध्ये नोकरीनिमित्त ते मुंबई येथे आले. तेथे एअरपोर्ट हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी आपल्या कलासाधनेला सातत्याने जोपासले आणि चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींना राज्यस्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. निसर्गावरील त्यांची चित्रे आणि छायाचित्रे रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली असून निसर्गरंग या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कलासाधनेला एक नवे व्यासपीठ प्राप्त झाले आहे.या प्रदर्शनास कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरांतून भागवत सपकाळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !