भुसावळात बालकाच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग : पहिल्याच दिवशी 50 वर भटक्या कुत्र्यांना पकडले
उद्यापासून तक्रार आलेल्या भागात मोहिम : 15 दिवसात मोहिम होणार पूर्ण
भुसावळ (3 जून 2026) : शहरातील नऊ वर्षीय तारकेश झोपे या बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या होत्या तर उदासीन पालिकेच्या कारभाराबाबतही संताप व्यक्त करण्यात येत होता. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नी निविदा काढल्यानंतर ठेकेदाराकडून होणारी चालढकल पाहता नागरिकांनी थेट प्रशासनाकडे तक्रारी व मोर्चा काढल्यानंतर ठेकेदाराने बुधवार, 3 जूनपासून मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू केली आहे. जामनेर रोडवरील वाल्मीक नगरापासून बुधवारी सकाळी 11 वाजता मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 50 वर मोकाट कुत्र्यांना पकडण्यात आले. सलग 15 दिवस ही मोहिम राबवण्यात येणार असून उद्यापासून ज्या भागातून नागरिकांच्या तक्रारी येतील तेथे कंत्राटदाराची माणसे मोकाट कुत्र्यांचा बंदाबस्त करतील.
बालकाच्या मृत्यूनंतर पालिकेला आली जाग
भुसावळच्या नारायण नगरातील रहिवासी तारकेश विशाल झोपे (9.5, नारायण नगर, भुसावळ) हा बालक शाळेत जात असताना 24 एप्रिल रोजी त्याला श्वानांनी घेरत दंश केला होता व जळगावातील उपचारादरम्यानंतर मुंबई उपचारादरम्यान त्याचा 13 मे रोजी मृत्यू ओढवला होता. बालकाच्या मृत्यूनंतर समाजमन संतप्त झाले होते तर प्रशासनाकडे तक्रारींचा रेटा वाढला होता. बालकाला दंश करणारे श्वान हे खन्ना कोळी यांचे असल्याने त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील कुत्रीदेखील जप्त करण्यात आली होती.
पालिकेला जाग : पहिल्याच दिवशी 50 कुत्रे पकडली
परभणी ठेकेदाराला मोकाट कुत्री पकडण्याचा कंत्राट देण्यात आला असून बुधवारी सकाळी 11 वाजता प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजपा गटनेता युवराज लोणारी, पुरूषोत्तम नारखेडे, अॅड.बोधराज चौधरी, नगरसेविका शोभा इंगळे, प्राची पाटील, सोनम इंगळे, देवा वाणी, नितीन धांडे, किरण कोलते, कैलास पाटील आदींच्या उपस्थितीत
नेहरू मैदान, वाल्मीक चौकापासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 50 वर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आल्याचे युवराज लोणारी यांनी सांगितले. गुरुवारपासून ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी येतील त्या भागात प्रथम प्राधान्याने मोकाट कुत्रे पकडण्यात येतील, असे सांगण्यात आले.
कुत्र्यांचे होणार निर्बिजीकरण
पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने कचरा डेपोच्या परिसरात निवारागृह उभारले असून तेथे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येईल व त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पालिकेला उशिरा का होईना जाग आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
खाजगी कुत्र्यांचासह डाटा संकलीत करा : डॉ.नितु पाटील
भुसावळ पालिका प्रशासनातर्फे भटके कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू झाल्याची बाब कौतुकास्पद आहे मात्र त्यासोबत पालिकेने पंधरा दिवस व्यापक मोहीम राबवून ज्यांच्याकडे खाजगी कुत्रे आहे त्यांचा डाटा तयार करावा आणि प्रत्येक कुत्र्याला एक बिल्ला क्रमांक द्यावा जेणेकरून अशा कुत्र्यांची माहिती नगरपालिकेकडे संकलीत राहील. तारकेश झोपे या शाळकरी विद्यार्थ्याचा रेबी मुळे मृत्यू झाल्याला निश्चितच कुठेतरी पालिका प्रशासन जवाबदार आहे. पालिका प्रशासनाने त्यांच्या पालिका निधीमधून झोपे परिवाराला सानुग्रह मदत म्हणून किमान पाच लाखांची मदत करावी, असे भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.



