अपघातानंतर प्रथमोचार कसे द्यावेत ? भुसावळातील विद्युत लोको शेडमध्ये कर्मचार्यांना प्रशिक्षण
भुसावळ (4 जून 2026) : शहरातील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये कर्मचारी आणि तंत्रज्ञांसाठी नुकतेच एक दिवसीय ’प्राथमिक प्रथमोपचार आणि विद्युत शॉक ट्रीटमेंट’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. हे प्रशिक्षण शेडचे वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. रेल्वे कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करता यावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून भुसावळ डिव्हिजनल रेल्वे हॉस्पिटलचे डीएमओ डॉ.जितेश ठाकूर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव कसा वाचवायचा, याबद्दलचे महत्त्वपूर्ण तंत्र समजावून सांगितले.
प्रात्यक्षिकाद्वारे दिले धडे
या शिबिरात विद्युत लोको शेडमधील कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. केवळ थिअरी न शिकवता कर्मचार्यांकडून प्रत्यक्ष प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) करून घेण्यात आले. यामध्ये खालील प्रमुख बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
धोक्यापासून बचाव व रेस्क्यू
विद्युत अपघात झाल्यास पीडित व्यक्तीला सुरक्षितपणे कसे बाहेर काढावे
एअर सर्क्युलेशन व ब्रिथिंग
श्वास रोखला गेल्यास हवा खेळती ठेवून श्वसनक्रिया कशी सुरू करावी
सीपीआर ट्रेनिंग
हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर शॉक लागल्यास अत्यंत महत्त्वाचे असणारे सीपीआर कसे द्यावे
त्वचा प्रथमोपचार
विद्युत शॉकमुळे त्वचा भाजल्यास किंवा इजा झाल्यास तातडीने कोणते उपचार करावेत
या प्रशिक्षणामुळे रेल्वे कर्मचार्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण झाली. आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यशस्वीतेसाठी शेडमधील इतर अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.



