यावल पोलिस ठाण्यात मस्जिद ट्रस्टी, मौलाना, मंदिर ट्रस्टी व पूजार्यांची बैठक : सुरक्षेचा घेतला आढावा
यावल (15 जून 2026) : शहरातील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी शहरातील सर्व मशिदीचे ट्रस्टी व मौलाना आणि मंदिराचे ट्रस्टी व पुजारी यांच्या वेगवेगळ्या बैठकी घेतल्या. या बैठकीमध्ये मंदिर आणि मस्जीद परिसरातील सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मंदिर आणि मशिदीवरील ध्वनीक्षेपांच्या आवाज मर्यादा संदर्भात सूचना करण्यात आल्या तर मर्यादेपेक्षा जास्त आवाज आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे पालन केले जावे अशा सूचना या प्रसंगी पोलीस निरीक्षकांनी केल्या.
यांची होती उपस्थिती
यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी शहरात असलेल्या विविध मशिदीच्या ट्रस्टींची व मौलांनासह पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये हाजी शब्बीर खान, माजी नगरसेवक अताऊल्ला खान, एजाज देशमुख, हबीब मंजर, शफी शाहसह विविध मस्जीदचे मौलाना व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी शहरातील सर्व मशिदीवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेप यांचा आवाज मर्यादित असायला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन प्रत्येक मशीद संस्थांनी करावे, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मशिदीच्या आत बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे हे सक्षम व चांगल्या क्वालिटीचे लावण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या तसेच कुठे-कुठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सुरक्षेची काय-काय व्यवस्था आहे या संदर्भातील आढावा या बैठकीत त्यांनी घेतला. या प्रसंगी मस्जीद संस्थानच्या संर्दभातील माहिती पो.ना.पुरूषोत्तम पाटील, अनिल साळुंके यांच्या वतीने घेण्यात आली.


मंदिर ट्रस्टींची बैठक
पोलीस ठाण्यात शहरातील मंदिर ट्रस्टींची व पुजारींची एक स्वतंत्र बैठक बोलवण्यात आली. पोलीस निरीक्षकांनी मंदिरातील सुरक्षिततेची व्यवस्था कशी आहे, या संदर्भात माहिती जाणून घेतली व आढावा घेतला त्याचप्रमाणे मंदिराच्या आत आणि बाहेर मंदिर ट्रस्टींच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत? जिथे नसतील तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लोकवर्गणीतून बसवण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या. एकूणच शहरातील सर्व मंदिर ट्रस्टींची आपापल्या मंदिराची सुरक्षेची जबाबदारी देखील त्यांनी पाळावी व सुरक्षेची व्यवस्था देखील करावी अशा सूचना प्रसंगी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केल्या.

