साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये गुलाबपुष्पांनी विद्यार्थ्यांचे स्वागत
भुसावळ (15 जून 2026) : श्री स्वामिनारायण गुरुकुल, साकेगाव विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-2027 च्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत आगमन करणार्या विद्यार्थ्यांचे टिळा लावून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना किशमिश, काजू, बदाम देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद आणि उत्साहाचे भाव दिसून येत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे संचालक गोपाळ भगत यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व नियमित अध्ययन, शिस्त आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्ज्वला धांडे, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रवेशोत्सवानिमित्त शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि चैतन्याने फुलून गेला होता. विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवउमेद निर्माण झाली.



