भुसावळात शिस्तीच्या खात्यातील अधिकार्यांनी गिरवले योगाचे धडे
भुसावळ पोलीस उपविभागातर्फे जागतिक योग दिन 2026 उत्साहात
भुसावळ (21 जून 2026) : निरोगी शरीर, शांत मन हाच पोलिसांचा खरा दागिना आणि योग: कर्मसु कौशलम हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून शिस्तीच्या खात्यातील अर्थात पोलीस दलातील अधिकार्यांनी रविवार, 21 रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगाचे धडे गिरवले.
शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर योग शिबिर
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कार्यायलाबाहेर रविवारी सकाळी सहा ते आठ दरम्यान विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली.



योगासनांचे प्रात्यक्षिक
महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ, भुसावळच्या वतीने आयोजित या शिबिरात नामांकित योग प्रशिक्षक यश प्रसाद आंबेकर आणि डॉ.राधा प्रसाद आंबेकर यांनी उपस्थित सर्व पोलीस बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान आणि तणावमुक्तीसाठी उपयुक्त असणार्या विविध योगक्रियांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण दिले. दैनंदिन पोलीस कर्तव्य बजावताना येणार्या मानसिक व शारीरिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग साधना कशी जीवनशैलीचा भाग बनवता येईल, यावर त्यांनी विशेष भर दिला.
अधिकारी व कर्मचार्यांचा सहभाग
या योग शिबिरासाठी भुसावळ उपविभागांतर्गत येणार्या विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलातील प्रत्येक घटकाचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी, या उद्देशाने राबवण्यात आलेले हे योग शिबिर वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.

