जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ न्यायालयात योग शिबिर उत्साहात
तालुका विधी सेवा समितीच्या पुढाकाराने आयोजन; न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचार्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Yoga camp held with enthusiasm at Bhusawal Court on the occasion of International Yoga Day भुसावळ (21 जून 2026) : जागतिक योग दिनानिमित्त रविवारी सकाळी आठ वाजता तालुका विधी सेवा समिती, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ यांच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 मा. एस.बी.हेडाऊ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या योग शिबिरात अनुभवी योग प्रशिक्षक मनोजकुमार रावत आणि शीला मनोजकुमार रावत यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यान पद्धतींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. उपस्थितांनी उत्साहाने योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.



यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास एस.बी.हेडाऊ (जिल्हा न्यायाधीश-1, भुसावळ), जी. बी.पवार (सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), एम.आर.बागडे (द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भुसावळ वकील संघाचे पदाधिकारी अॅड.अभिजीत मेने व अॅड.भूपेश बाविस्कर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
योग शिबिराचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अधीक्षक श्री एस.एस.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक डी.आर.चौधरी, कनिष्ठ लिपिक गणेश निंबोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
निरोगी जीवनशैलीसाठी योग आवश्यक
न्या.एस.बी.हेडाऊ यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. नियमित योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन, मानसिक एकाग्रता, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास भुसावळ जिल्हा न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरातून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यात आला.

