महेंद्रा पिकअपच्या धडकेत पती-पत्नी ठार
रावेर- भरधाव महेंद्रा पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवरील वनरक्षक महिलेसह तिच्या पतीचाही मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सहस्रलिंगजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर पीकअप चालक पसार झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये प्रादेशिक वनीकरणाच्या वनरक्षक ममता पाटील व त्यांचे पती हेमंत पाटील यांचा समावेश आहे.
पालकडे जाताना अपघात
पाटील दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून शासकीय कामानिमित्त पालकडे सोमवारी दुचाकीने निघाले असताना सहस्रलिंगनजीक भरधाव महेंद्र पीकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली. दुचाकीच्या जोरदार धडकेत वनरक्षक ममता पाटील या जागीच गतप्राण झाल्या तर त्यांचे पती हेमंत पाटील यांना जळगाव येथे हलवत असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती कळताच वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांनी वनपाल अतुल तायडे , संजय भदाणे, वनरक्षक हरीष थोरात यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. मृत दाम्पत्याचे मृतदेहावर रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर पीकअप चालक पसार झाला आहे. मृत वनरक्षक ममता पाटील या पालला नोकरीस होत्या तर त्यांच्या पश्चात चार वर्षीय मुलगी आहे.