भुसावळातील भोळे महाविद्यालयात अंमली पदार्थ सेवनाविरोधात घेतली शपथ
भुसावळ (22 जून 2026) : देशभरात सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियान कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 22 रोजी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात अंमली पदार्थ सेवन विरोधी पथक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधीन असणार्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंमली पदार्थांचे व्यसन घातक
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन हे आता शहरापुरते मर्यादित राहिले नसून प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत आलेले आहे. म्हणून प्रत्येकाने जागरुक असतानाच आपल्या परिसरात कुणी अंमली पदार्थ सेवन करीत नाही हे पाहणे गरजेचे असल्याचे सांगत कुठलेही व्यसन घातक असल्याचे म्हटले.
प्राध्यापकांसह कर्मचार्यांनी घेतली शपथ
प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी उपस्थिताना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने पुरवलेली शपथ दिली. ही शपथ ग्रहण करताना महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले. यशस्वितेसाठी प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रकाश चौधरी, दीपक महाजन, विजय पाटील, प्रकाश सावळे यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर-कर्मचारी उपस्थित होते.

