मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दोन कर्मचार्‍यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान


भुसावळ (23 जून 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दोन कर्मचार्‍यांना महाव्यपस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी जून 2026 महिन्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कर्मचार्‍यांना त्यांच्या सतर्कतेबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि रेल्वेच्या सुरक्षित परीचालनासाठी केलेल्या समयसूचक कार्यवाहीबद्दल ‘संरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

उत्कृष्ट कार्याचा गौरव
कर्तव्यावर असताना कर्मचार्‍यांनी दाखवलेली समयसूचकता आणि समर्पण वृत्ती यांच्या कौतुकार्थ हे संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास आणि प्रवासी व रेल्वे परीचालनाची संरक्षा सुनिश्चित करण्यास मदत झाली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट संरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे.

कर्मचार्‍यांच्या कार्याचा गौरव
भुसावळ यार्ड तंत्रज्ञ रवींद्र गणवीर यांनी 3 मे 2026 रोजी नियमित देखभाल तपासणीचे काम करत असताना त्यांना ’बीओएक्सएनएचएल’ प्रकारच्या वॅगनचे ग्रीस सील सैल असल्याचे दिसून आले. ही त्रृटी वेळीच दुरुस्त न केल्यास अपघात होऊ शकला असता. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली आणि वेळेवर कार्यवाही करण्यात आली, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

भुसावळ विभागातील बडनेराचे गेटमन बळीराम शंकर चौधरी हे 15 मे 2026 रोजी कर्तव्यावर असताना त्यांना तेथून जाणार्‍या एका मालगाडीच्या चाकाचा अक्ष अतिगरम (हॉल अ‍ॅक्सल) झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित लाल सिग्नल दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी न थांबल्यामुळे, त्यांनी पुढील गेटमनला गाडी थांबवण्यासाठी सतर्क केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

महाव्यवस्थापकांनी पुरस्कारप्राप्त कर्मचार्‍यांचे त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या आदर्श निष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे इतर रेल्वे कर्मचारीही प्रवाशांची संरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याबाबत सतर्क व कटिबद्ध राहण्यास प्रेरित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रकिशोर प्रसाद, इतर विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !