जळगाव जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे वाहन चालकांची मद्यपान चाचणी
विद्यार्थी वाहतूक करणार्या चालकांची अचानक तपासणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेचे जनतेतून स्वागत
जळगाव (25 जून 2026) : जळगाव जिल्ह्यातील वाढत्या अपघाताला रोखण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेनुसार विविधांगी उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गुरुवारी पोलीस दलाने जिल्हाभरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या विविध वाहनांवरील चालकांची गुरुवार, 25 रोजी सकाळपासून ब्रेथ अॅनालायझरद्वारे अचानक मद्यपान चाचणी सुरू केली आहे. या मोहिमेनंतर मद्यपी चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे तर पालकांसह सुज्ञ जिल्हावासीयांनी या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. विशेष म्हणजे प्रवासी वाहतूक करणार्या चालकांचीदेखील तपासणी केली जात आहे.
मद्यपानाला बसेला आळा
या मोहिमेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित ठेवणे, वाहनचालकांमध्ये जबाबदारीची भावना अधिक दृढ करणे आणि पालकांचा विश्वास वाढविणे हा आहे. त्यामुळे शालेय वाहन चालविताना मद्यपानासारख्या गंभीर प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.


प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिसी भूमिका
जळगाव पोलिसांचा हा उपक्रम केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले एक संवेदनशील आणि दूरदृष्टीचे पाऊल मानले जात आहे. अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच प्रभावी पोलिसी भूमिका असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित होत आहे.
समाजाभिमुख आणि प्रतिबंधात्मक पोलीसिंगचे उत्कृष्ट उदाहरण ठरणार्या या मोहिमेचे नागरिक व पालकांकडून स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
