यावलला नाकाबंदीत ट्रकमध्ये सापडले अल्पवयीन प्रेमीयुगूल : मुलगी पालकांच्या ताब्यात
यावलला नाकाबंदीत ट्रकमध्ये सापडले अल्पवयीन प्रेमीयुगूल : मुलगी पालकांच्या ताब्यात
यावल (25 जून 2026) : यावल पोलिसांना मंगळवारी रात्री नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून यावलकडे येणार्या एका ट्रकमध्ये 17 वर्षीय मुलगा आणि एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आढळली होती.दरम्यान, हे अल्पवयीन मुले प्रेमीयुगल असल्याचे सांगत होते व ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी पोलिसांनी तिघांना वाहनासह ताब्यात घेत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला तर ताब्यातील अल्पवयीन मुलीला गुरुवारी तिच्या पालकांकडे सोपवले. यावल पोलिसांच्या दक्षतेचे अल्पवयीन मुलगी पालकांकडे परतली आहे.
काय घडले यावल शहरात ?
चोपड्याकडून यावलकडे येणार्या रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस हवालदार एजाज सलीम गवळी, हवालदार अर्षद कासम गवळी, वरिष्ठ फलटण नायक पंकज फिरके, पोलीस वाहन चालक ज्ञानेश्वर सपकाळे हे नाकाबंदी करत होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर ट्रक क्रमांक (जी.जे. 10 टी.व्ही. 7323) हा भरधाव वेगात यावल शहराच्या दिशेने येत असताना पथकाने त्यास थांबवले व ट्रक चालक अमोल शंकर जयप्रकाश पांडे (रा.भगवानपूर, बिहार) हा मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांना तो संशयास्पद उत्तर देत असल्याने व वाहनात कुणीही नाही, असे तो बोलू लागला, तेव्हा वाहनात काहीतरी असावे या हेतूने पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि त्याच्या ट्रकची झडती घेतली असता यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील उपरखेड येथील एक 17 वर्षीय मुलगा आणि त्याच्या सोबत शहादा तालुक्यातील एका गावातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी होती. पोलिसांनी दोघे अल्पवयीन व ट्रक चालकास ताब्यात घेतले. मुलीच्या पालकांनी माहिती देण्यात आल्यानंतर गुरुवारी मुलीचे आई-वडील पोलिस ठाण्यात आले असता अल्पवयीन मुलीस त्यांच्या सुपूर्त करण्यात आले. मुलगी सुखरूप परत मिळाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.


मुलीच्या गावातून केले पलायन
अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे असताना मावशीचे कुटुंब चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ऊस तोडीसाठी गेले असता उपरखेड, ता.सोयगाव, जि.छत्रपती संभाजी नगर येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील कुटुंबासह ऊसतोड करीता आला होता. तेथे दोघांची ओळख झाली होती व 23 जुन रोजी हा मुलगा त्या मुलीच्या गावात आला व तेथुन दोघे शिरपूर येथे आले व नंतर वरील ट्रक मध्ये बसुन ते भुसावळला जात होते. दरम्यान, दोघे ल्पवयीन असल्याने ते मद्यधूंद ट्रक चालकासोबत प्रवासाला निघाले व प्रसंगी मोठा गुन्हा देखील घडू शकला असता, तेव्हा परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चालकाला देखील ताब्यात घेतले व या अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या तर मुलास देखील त्याच्या नातेवाईकांना सोपवल्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.
