दीपनगरचे मुख्य अभियंता विराज चौधरींच्या बदलीसाठी ठेकेदारांचा घाट
259 कोटींच्या कामांना ब्रेक लावल्याने खेळी ः प्रामाणिक अधिकार्याला त्रास दिला जात असल्याने संताप
भुसावळ (2 जुलै 2026) : किफायतशीर दरात वीजनिर्मिती, कर्मचारी वसाहतीत सुविधा, कामकाजाला शिस्त व सुरक्षेच्या मुद्यांना प्राधान्य देणार्या दीपनगरातील मुख्य अभियंता विराज चौधरी यांनी दीपनगर केंद्रात डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडेप्रमाणे ओळख तयार केली आहे मात्र चौधरींच्या बदलीसाठी काही ठेकेदारांनी प्रयत्न सुरू केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. प्रामाणिक अधिकार्याला नाहक त्रास दिला जात असल्याने कर्मचारी संघटना, अधिकारी व कर्मचार्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
259 कोटींच्या अनधिकृत कामांना लावला ब्रेक
दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मुख्य अभियंता विराज चौधरी यांनी इंधन अधिभाराचा खर्चातून 259 कोटींच्या अनधिकृत कामांना ब्रेक लावला. यानंतर गेल्या 20 वर्षांपासून महानिर्मितीचे निवासस्थान बळकावून असलेल्या तथाकथित ठेकेदारांची निवासस्थाने रिकामी केली. यासोबतच सुरक्षेच्या कारणाने काही प्रवेशव्दार बंद केले. महानिर्मितीचा अनाठायी होणारा खर्च थांबवून 90 टक्के पीएलएफने किफायतशीर दरात वीजनिर्मितीचा टप्पा गाठला. या सर्व कार्यामुळे महानिर्मितीमध्ये विराज चौधरींची ओळख अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडेंप्रमाणे झाली आहे मात्र अनधिकृत व केवळ निधीची उधळपट्टी करणार्या काही कंत्राटदार व अधिकार्यांना चौधरींच्या कार्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मुख्य अभियंता चौधरींच्या बदलीचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. दीपनगरातील कर्मचारी संघटना व प्रामाणिक अधिकार्यांनी तथाकथित ठेकेदार व लोकप्रतिनिधींच्या या कृत्याबद्दल याबाबत संताप व्यक्त केला आहे.


त्रासाबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या
दीपनगर केंद्रात 30 जून रोजी कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता चौधरी यांनी त्यांना होणार्या त्रासाबद्दलची भावना व्यक्त केली. काही लोकप्रतिनिंधींनी आपल्याला बोलावून प्रचंड अपमान केला मात्र कितीही त्रास दिला तरी आपण महानिर्मिती व कर्मचार्यांसोबत बांधील आहोत, प्रामाणिकपणे महानिर्मितीच्या हिताचेच काम करू. कोणत्याही स्थितीत महानिर्मितीचे अहित होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगताच कर्मचार्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला. दरम्यान, या संदर्भात वृत्त आज ‘दैनिक दिव्य मराठीने’ आज प्रसिद्ध केले आहे.
