नाशिक विभागीय आयुक्तांनी जाणुन घेतल्या आदिवासी नागरिकांच्या समस्या : लालमातीत ‘विशेष संवाद’
सावखेडा बु.॥ येथे केली घरकुलांची पाहणी : लाभार्थींशी साधला संवाद
जळगाव (3 जुलै 2026) : नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी जळगाव जिल्हा दौर्यादरम्यान रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम लालमाती येथील शासकीय आदिवासी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेला भेट दिली त्यानंतर येथे आयोजित एक विषेश संवाद कार्यक्रमात आदिवासी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आश्रमशाळा भेटप्रसंगी त्यांनी शाळेतील डिजिटल क्लासरुम सुसज्ज आभ्यासिका आणि वर्ग खोल्यांच्या नियोजनाची पहाणी केली. आधुनिक शिक्षण प्रणालीचा आश्रमशाळेत होत असलेला वापर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
यावेळी त्यांनी सहस्त्रलिंग गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे तसेच लालमाती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करून मंजुरी देण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.

या विशेष संवादादरम्यान आदिवासी महिला व ग्रामस्थांनी सहस्त्रलिंग पाझर तलावाची दुरवस्था, आरोग्य उपकेंद्राची अवस्था, रानडुकरांकडून पिकांचे होणारे नुकसान, संरक्षण कुंपणाची गरज, रस्ते, गटारी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळेतील शिक्षकांची कमतरता तसेच गावाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत विविध समस्या मांडल्या. त्यावर विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांना आवश्यक कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
यापूर्वी गेडाम यांनी रावेर तालुक्यातील सावखेडा बु.॥ येथे घरकुल कॉलनीची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला. घरकुलांच्या गुणवत्तेची पाहणी करताना लाभार्थींच्या अडचणी जाणून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी ग्रामस्थांनी सावखेडा-लोहारा रस्त्यावरील पुलांची उभारणी, शेतरस्ते, जलजीवन मिशनची कामे पूर्ण करणे, वाचनालय व नवीन घरकुलांची मागणी आदी विषय मांडले. त्यावर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
यादौर्याप्रसंगी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी बबनराव काकडे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, परीवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब वाळके, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल भंगाळे, जलसंधारण विभाग वरिष्ठ सहाय्यक प्रशांत भोगे, सावखेडा बुद्रुक सरपंच युवराज कराड, सावखेडा खुर्द सरपंच रवींद्र बखाल व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
