रावेर तालुक्यातील शासकीय कार्यालयांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

ई-ऑफिस, महा ई-सेवा, वनहक्क आदी विषयांचा घेतला आढावा


रावेर (3 जुलै 2026) : नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी आज रावेर तालुक्यातील रोझोदा येथील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि महा ई-सेवा केंद्राला देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे, परिवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी शेती आणि बिनशेती क्षेत्र एकत्र नोंद असलेल्या 7/12 उतार्‍यांमुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी येणार्‍या अडचणी येत असल्याची बाब गांभीर्याने घेत, जमाबंदी आयुक्तांच्या परिपत्रकानुसार शेती व बिनशेती क्षेत्राचे स्वतंत्र 7/12 उतारे तयार करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.


रावेर तालुक्याच्या दौर्‍यात आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाल व गारबर्डी परिसरातील वनविभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केल्यानंतर रोझोदा येथील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि महा ई-सेवा केंद्राला भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधताना 7/12 उतार्‍यांमध्ये शेती व बिनशेती क्षेत्र एकत्र असल्यामुळे वारस नोंदी, कर्ज, खरेदी-विक्री तसेच इतर महसुली कामांमध्ये येणार्‍या अडचणी नागरिकांनी मांडल्या. यानंतर स्वतंत्र 7/12 तयार करण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

मोहमांडली येथील नागरिकांच्या वसाहतीसाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेले सामूहिक वनहक्क प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आले. तसेच रोझोदा येथील शैलेश राजेंद्र मेढे यांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर झालेल्या चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे मंजुरीपत्र देण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाही मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्तांनी रोझोदा येथील दोन मतदारांच्या घरी भेट देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडून सुरू असलेल्या ईएफ फॉर्म वितरण, संकलन आणि डिजिटायझेशन (एसआयआर) प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी कामकाज अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामकाजाचा आढावा घेत ई-ऑफिस, बिम्स, महाऑनलाइनद्वारे प्रमाणपत्र वितरण आणि ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यात आली. सर्व कार्यालयीन कामकाज आणि पत्रव्यवहार ई-ऑफिसद्वारेच करण्याचे निर्देश देत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !