आषाढी एकादशीसाठी उधना-मिरज विशेष रेल्वेची घोषणा
पंढरपूरच्या भाविकांसाठी चार विशेष फेर्या : जळगाव, पाचोरा, चाळीसगावसह अनेक स्थानकांवर थांबा
भुसावळ (5 जुलै 2026) : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो वारकरी आणि भाविक दाखल होतात. या काळात होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना-मिरज दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या एकूण 4 फेर्या होणार आहेत. खान्देशातील जळगाव, पाळधी, धरणगाव, अमळनेर, पाचोरा आणि चाळीसगाव परिसरातील भाविकांनाही या गाडीचा मोठा लाभ होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09071 विशेष रेल्वे 23 व 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटेल. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 7.30 वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 09072 ही 24 व 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 7.50 वाजता उधना येथे पोहोचणार आहे.

या स्थानकावर थांबा
या विशेष गाडीला चलथान, बारडोली, व्यारा, उकाई सोनगढ, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, पाळधी, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विशेष गाडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी 20 शयनयान डबे, 2 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन अशी एकूण रचना ठेवण्यात आली आहे. आषाढी यात्रेदरम्यान होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुरेशी आसनक्षमता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे.
विशेष रेल्वेमुळे पंढरपूरकडे जाणार्या वारकरी, भाविक तसेच इतर प्रवाशांना नियमित गाड्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जळगाव विभागातील प्रवाशांसाठीही ही सेवा सोयीची ठरणार आहे. थेट पंढरपूरमार्गे मिरजपर्यंत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
