भुसावळ आगाराचा भाविकांना मोठा दिलासा : 40 प्रवासी एकत्र आल्यास पंढरपूरसाठी स्वतंत्र बस
Major relief for devotees from Bhusawal Depot : Dedicated bus to Pandharpur if 40 passengers gather भुसावळ (6 जुलै 2026) : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणार्या वारकर्यांची आणि भाविकांची सोय व्हावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसली आहे. भुसावळ आगाराकडून यंदा आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी आगाराने एक सुवर्णसंधी दिली आहे. ग्रामीण किंवा शहरातील कोणत्याही एकाच भागातून किमान 40 प्रवासी एकत्र आले तर एसटी महामंडळ थेट त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्यात येईल, अशी माहिती भुसावळ आगारप्रमुख राकेश शिवदे यांनी दिली.
पंढरपूर यात्रेसाठी मिळणार जादा बसेस
या योजनेमुळे भाविकांना आपल्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुन्हा थेट आपल्या गावापर्यंत एसटीने सुरक्षित प्रवास करता येणार आहे. पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस उपलब्ध करून द्याव्या लागणार असल्याने भुसावळ आगाराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या काळात भुसावळ आगारातून सुटणार्या काही लांब पल्ल्याच्या नियमित बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भुसावळ-नागपूर, नाशिक, अमळनेर, धुळे आणि मेहकर या मार्गांवरील बसेसचा समावेश आहे. या गाड्या रद्द करून त्यांचे नियोजन पंढरपूर यात्रेसाठी करण्यात आले आहे.

यात्रेनंतर सर्व बसेस पुन्हा पूर्ववत धावणार
आषाढी यात्रेनंतर या सर्व बसेस पुन्हा पूर्ववत सुरू होतील. बस स्थानकावर बस मध्ये बसण्यासाठी प्रवाशांची होत असलेली गर्दी. आगार प्रमुखांचे भाविकांना आवाहन. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणार्या कोणत्याही भाविकाची गैरसोय होऊ नये, यासाठी भुसावळ आगार पूर्णपणे कटिबद्ध आहे. ग्रामीण भागातील भजनी मंडळे, संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन 40 प्रवाशांची नोंदणी करावी आणि आपल्या गावातून थेट बस मिळवावी. प्रवाशांनी या विशेष बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमखु राकेश शिवदे यांनी केले.