भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 18 सायकलपटूंचे पंढरपूर वारीसाठी प्रस्थान


भुसावळ (10 जुलै 2026) : आषाढी वारीचे औचित्य साधत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 18 सायकल वारकर्‍यांनी गुरुवारी पहाटे सहा वाजता शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या प्रस्थान सोहळ्यास असोसिएशनचे धावपटू, महिला धावपटू तसेच सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सायकलवारकर्‍यांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

430 किलोमीटरचा प्रवास
या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. विठ्ठल नामाचा गजर करत आणि भक्तिमय वातावरणात या पथकाने पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. या सायकलवारीदरम्यान सुमारे 430 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. मार्गात दोन ठिकाणी मुक्काम करण्यात येणार आहे. दररोज सुमारे 170 किलोमीटर अंतर सायकलवरून पार करत हे सर्व सायकलवारकरी शनिवारी तिसर्‍या दिवशी पंढरपूर येथे पोहोचतील. पंढरपूर येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सायकल वारकर्‍यांसोबत हे सर्वजण महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिंगण सोहळ्यात सहभागी होतील.

यांची होती उपस्थिती
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक, विश्वस्त सचिन अग्रवाल, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील यांच्याहस्ते असोसिएशनचा झेंडा दाखवून सायकलवारीला शुभारंभ करण्यात आला. सर्व सायकलवारकर्‍यांना सुरक्षित, यशस्वी आणि मंगलमय वारीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

सायकलवारीत सहभागी सायकलपटू असे
प्रवीण फालक, जगदीश रेहपाडे, युवराज सूर्यवंशी, विश्वनाथ पावरा, अरुण शिंदे, भाऊसाहेब पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, गजानन पाटील, अनंता पाटील, मधुकर इंगळे, विद्याधर इंगळे, समीर चौधरी, डॉ. राहुल भोईटे, मनोहर पाटील, सचिन काळे, केतन बुचडे, विनय बडगुजर आदींचा समावेश आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !