पावसाळी अधिवेशनादरम्यान हमाल बांधव सरकारसह खासदारांशी संवाद साधणार : राष्ट्रीय हमाल आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय


भुसावळ (10 जुलै 2026) : देशभरातील हमाल बांधवांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदारांसह सरकारसोबत चर्चा करण्याचा निर्धार राष्ट्रीय हमाल आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत करण्यात आला.

विविध प्रश्नांवर होणार चर्चा
रेल्वेच्या नोकरीत हमालांना सामावून घेणे, त्यांच्या उपजीविकेबाबत आणि सामाजिक सुरक्षेबाबतच्या आदेशांची तळागाळात अंमलबजावणी, या संदर्भात करण्यात आलेली चौकशी आणि बॅटरी कार, ट्रॉली सिस्टीम, माय पोर्टर अ‍ॅप इत्यादी रेल्वे स्थानकावरील सामान हाताळणीची सर्व कामे हमाल सहकारी संस्थांकडे हस्तांतरित करणे, या म्द्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यासाठी देशभरातील हमालबांधव दिल्ली गाठणार आहेत. राष्ट्रीय हमाल आघाडीच्या आभासी बैठकीत (ऑनलाईन) हा निर्णय घेण्यात आला. सही किंवा नाव नसलेल्या बनावट तक्रारीच्या आधारे राष्ट्रीय कुली मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक राम सुरेश यादव यांच्या मानसिक छळाबद्दलही या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याविरोधात आंदोलन नोंदवून दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समन्वयक राम सुरेश यादव होते. समन्वयक चंडेश्वर मुखिया यांनी बैठक बोलावली.

खाजगीकरण धोरणाचा हमालांकडून निषेध
या बैठकीत हमालांनी सांगितले की, काही कॉर्पोरेट घराण्यांना फायदा व्हावा आणि मर्जीतील कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी रेल्वेमध्ये राबवल्या जाणार्‍या खाजगीकरणाच्या धोरणांद्वारे हमालांची उपजीविका नष्ट करण्यावर सरकार ठाम आहे. आज परिस्थिती अशी आहे की, रेल्वेत काम करणार्‍या हमालांचे काम देशी आणि परदेशी कंपन्यांना तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मना दिले जात आहे. स्टेशनवर बेकायदेशीरपणे माल वाहतुकीसाठी बॅटरी कारचा वापर केला जात आहे. राष्ट्रीय कुली मोर्चाच्या पुढाकारानंतर, रेल्वे मंत्रालयाने 19 जून 2025 रोजी हमालांच्या राहणीमानाची आणि सरकारी धोरणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची चौकशी केली परंतु ही चौकशी आजपर्यंत संसदेत सादर करण्यात आलेली नाही त्यामुळे कुली प्रतिनिधी देशाची राजधानी दिल्ली येथे जाऊन पावसाळी अधिवेशनात कुलींच्या परिस्थितीच्या चौकशीचा अहवाल संसदेत मांडण्याचा मुद्दा उपस्थित करतील आणि सरकारला त्यानुसार कार्यवाही करण्याचे आवाहन करतील.

यांचा बैठकीत सहभाग
ऑनलाईन बैठकीत पंकज यादव, अदनान अहमद, अरुण कुमार यादव, कन्हैया ग्वाला, राहुल कुमार यादव, भुसावळातील रहिवासी व नॅशनल पोर्टर फ्रंट मुंबई विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अनिल सावळे, आनंद, राजकुमार यादव, शेख रहमतुल्ला, रामबाबू बिलाला, राम महावर, कलीम मकरानी, संजय पासवान, अरविंद कुमार, राज कपूर, राजकुमार, अरुण कुमार भाई, शिवराम भाई, अमित कुमार, अमित कुमार, अमित यादव यादव, अरविंद यादव, दीपक, आनंद, भवन लाल, शोभन, राजू टेकम आदी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !