सावद्यात रस्त्यावरील अतिक्रमणासह बेशिस्त पार्किंगवर कारवाई


सावदा (गुरुवार, 16 जुलै 2026) : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सावदा पोलिसांनी धडक मोहीम राबवत रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली वाहने हटवली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा माता चौक ते शहरातील मुख्य बाजारपेठ या मार्गावर ही विशेष मोहीम राबवण्यात आल्यानंतर शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

कारवाईने उडाली खळबळ
सावदा शहरातील मुख्य मार्ग अरुंद असतानाच रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने तासनतास उभी केली जातात. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. अशा उभ्या केलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका, शालेय बस, इतर आपत्कालीन वाहने तथा पादचार्‍यांना अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने हटवली. अनेक वाहनधारकांना समज देण्यात आली. तसेच दुकानदारांनी आपल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, ही खबरदारी घेण्याची सूचना केली. उपनिरीक्षक राहुल सानप, हवालदार उमेश पाटील, मयूर पाटील, नीलेश बाविस्कर उपस्थित होते.

नियमभंग करणार्‍यांवर कारवाई निश्चित
सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड म्हणाले की, विनाकारण रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई होईल. नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. शहरातील व्यावसायीक, वाहन चालकांनी वाहतूक नियम पाळावेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !