भुसावळात 20 रोजी ‘सूर्यकन्येचा जन्मोत्सव’ : तापी मातेला अर्पण करणार सुरतहून मागवलेली 108 मीटरची साडी
सूर्यकन्या तापी भक्त परिवार आणि साई निर्मल फाऊंडेशनतर्फे तापी महाआरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन
भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव शहरात सोमवार, 20 रोजी विविध कार्यक्रमांनी थाटात साजरा केला जाणार आहे. आषाढ शु. सप्तमीनिमित्त सोमवार, 20 जुलै 2026 रोजी भव्य ‘तापी माता जन्मोत्सव’ आणि तापी महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूर्यकन्या तापी भक्त परिवार, भुसावळ आणि ‘साई निर्मल फाऊंडेशन, भुसावळच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
108 मीटर साडी चुनरी ठरणार मुख्य आकर्षण
यावर्षीच्या जन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तापी मातेला अर्पण करण्यात येणारी 108 मीटर लांबीची भव्य साडी चुनरी असेल. ही विशेष साडी चुनरी गुजरातमधील सुरत शहरातून खास मागवण्यात आली आहे. अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेली ही चुनरी तापी मातेला अर्पण करतानाचा सोहळा भाविकांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे.


हा भव्य जन्मोत्सव सोहळा सोमवार, 20 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी सुरू होईल. शहरातील जुने महादेव मंदिर, तापी घाट (जिल्हा जळगाव) येथे या सोहळ्याचे आणि भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सूर्यकन्या तापी भक्त परिवार आणि साई निर्मल फाऊंडेशनच्या वतीने सर्व भाविक-भक्तांना या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन तापी मातेची महाआरती करावी आणि दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहितीसाठी 9325147700 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.