दीपनगरात 400 कोटींची बोगस कामे झाल्याचा आरोप : एसआयटी चौकशीची मागणी
लढा उभारण्यासाठी बीटीपीएस कंत्राटदार असोसिएनची स्थापना ः अध्यक्षपदी प्रशांत पाटील
दीपनगर, ता.भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : दीपनगर प्रकल्पात स्थानिक कंत्राटदारांनाच कामे दिली जावीत शिवाय बाहेरील कंत्राटदारांनी कामे न करता कोट्यवधींचा मलिदा लाटल्याने त्यांची चौकशी करून दोषी अधिकार्यांविरोधात कारवाईची मागणी बीटीपीएस संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. लढा उभारण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
प्रकल्पात 400 कोटींचा भ्रष्टाचार
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र (बीटीपीएस) परिसरात स्थानिक कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक कंत्राटदारांना डावलून सातत्याने बाहेरील ठेकेदारांना कामे देण्यात आली तर अनेकांनी कामे न करताच बिले लाटल्याचा आरोप यावेळी नूतन अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केला. तब्बल 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा पाटील यांनी करीत तालुक्यात आगामी काळातील जाहीर सभांमध्ये याबाबत अधिक माहिती देवू, असेही त्यांनी सांगितले. स्थानिकांना कंत्राटदारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नवीन कंत्राट धोरण जाहीर करताना स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.


स्थानिक रोजगारावर परिणाम
बैठकीत उपस्थित पदाधिकार्यांनी आरोप केला की, अनेक महत्त्वाची व मोठ्या रकमेची कामे बाहेरील कंपन्यांना दिली जात आहेत. यामुळे स्थानिक रोजगारावर परिणाम होत असून परिसरातील व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. प्रशासनाने तातडीने धोरणात बदल करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काही कंत्राटदारांनी कामे पूर्ण न करताही किंवा निकृष्ट दर्जाची कामे करूनही त्यांची बिले मंजूर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी जाहीर
यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील तर उपाध्यक्षपदी अरुण इंगळे व कार्याध्यक्षपदी राजेंद्र चौधरी, खजिनदार रवींद्र नारायण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.