भुसावळात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली ; वाहतूक, सायबर गुन्हे व अंमली पदार्थांविरोधात नागरिकांना दिला जागरूकतेचा संदेश
भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : सुरक्षित वाहतुकीचे नियम, सायबर गुन्ह्यांपासून सतर्कता व अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी शहरातील स्व.पुंडलिक बर्हाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवार, 18 रोजी सकाळी जनजागृती रॅली काढली.
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बर्हाटे विद्यालयातील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतूक नियमांचे पालन, अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.


ही जनजागृती रॅली नहाटा चौफुली, जामनेर रोड, सिंधी कॉलनी चौक, अष्टभुजा माता मंदिर चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा स्वर्गीय पुंडलिक बराटे महाविद्यालयात दाखल झाली.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांना माहिती देत जागरूक राहण्याचा संदेश दिला.
या उपक्रमाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या जनजागृती अभियानाचे कौतुक केले. समाजात सुरक्षितता, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.