भुसावळात पेपर कोलाज चित्रकलेतून वृक्ष संवर्धनाचा संदेश ; शामा मुखर्जी उद्यानात अनोखा उपक्रम
भुसावळ (रविवार, 19 जुलै 2026) : स्नेहयात्री प्रतिष्ठान आणि रिडर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीच्या उद्देशाने रविवार, 19 जुलै रोजी शहरातील शामा मुखर्जी उद्यानात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला.
आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक तथा सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ येथील सेवानिवृत्त कला शिक्षक राजेंद्र जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात पेपर कोलाज या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला शैलीद्वारे झाडांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.


कार्यक्रमात लहान मुलांसह पुस्तक वाचक समूहातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. यावेळी मुलांना वृक्षारोपणासह झाडांचे संगोपन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
याप्रसंगी पर्यावरण मित्र नाना पाटील यांच्याहस्ते घनदाट सावली देणार्या विविध प्रजातींच्या 25 वृक्षांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
यशस्वीतेसााठी नितीन पाटील, कला शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक नाना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.