भुसावळात ‘श्री श्री जगन्नाथ रथयात्रा’ उत्साहात

हजारो भक्तांचा रथयात्रेत सहभाग ; मंत्री संजय सावकारे यांचाही सहभाग


भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : शहरातील कमल गणपती हॉलपासून रविावारी ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या गजरात, जय जगन्नाथच्या घोषात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा 2026 निमित्त रथ ओढण्यात आला. श्री श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामैयांच्या दर्शनासाठी आणि रथ ओढण्याच्या पुण्यकर्मासाठी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

रस्ता झाडत स्वच्छता
रथयात्रेच्या प्रारंभी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डीआरएम पुनीत अग्रवाल, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश चौधरी, उद्योजक मिलिंद अग्रवाल, पंकज जाधव, इस्कॉन चौपाटी मुंबई येथील नंद गोप प्रभुजी तसेच भुसावळ इस्कॉनचे अध्यक्ष रासयात्रा प्रभुजी यांच्या हस्ते भगवंतांची विधीवत आरती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी भगवान जगन्नाथांच्या मार्गावर स्वतः झाडू घेऊन रस्ता झाडत सेवा केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये सेवाभाव आणि भक्तीची अनोखी अनुभूती निर्माण झाली.


रथयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
रथयात्रेचा प्रवास शहरातील विविध मार्गांनी होत असताना ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. साई जीवन सुपर शॉपी येथे नगरसेवक निर्मल कोठारी व डॉ.हेमंत अग्रवाल यांनी आरती केली. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात माजी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे, सुजित भोळे, गणेश कांबळे तसेच मनीष नागराणी व पियुष अग्रवाल यांनी आरती अर्पण केली. जळगाव नाका-सातारा चौक येथे नगरपालिका भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी माजी नगरसेवक मुकेश पाटील व भागवत पाटील उपस्थित होते.

भाविकांना पाण्यासह प्रसाद वाटप
रथयात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी थंड पाणी, खिचडी प्रसाद, कोल्ड्रिंक्स, केळी आदींची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांच्या चेहर्‍यावरचा आनंद, भक्तिगीतांच्या सुरात मिसळलेला उत्साह आणि हरे कृष्णच्या अखंड गजरामुळे संपूर्ण वातावरण पवित्र व आनंदमय झाले होते.

रात्री सुमारे 8.30 वाजता रामानंद हॉलमध्ये महाआरतीने रथयात्रेचा भावपूर्ण समारोप करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या दिवसभराच्या भक्तीमय सोहळ्यामुळे संपूर्ण भुसावळ शहर एकाच भक्तीच्या धाग्यात बांधले गेले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !