स्वच्छ भारत अभियानाला गती ; भुसावळात दहा अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयांचे भूमिपूजन


भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुसावळ शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून शहरात दहा अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामांना सोमवारी प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

विविध मार्गावर होणार शौचालये
या योजनेअंतर्गत नगरपरिषदेने पुणे येथील जनकल्याण फाउंडेशन या संस्थेला शौचालयांच्या उभारणीचे काम देत कार्यादेश जारी केला आहे. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या गरजेनुसार दहा सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याशेजारील शौचालयाच्या कामास सुरुवात करण्यात आली.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उभारण्यात येणार्‍या दहा शौचालयांपैकी तीन शौचालये शहरातील प्रमुख मार्गांवर ‘पे अँड यूज’ तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत. या शौचालयांमध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि नियमित देखभाल यावर विशेष भर दिला जाणार असून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाची होणार अंमलबजावणी
विशेषतः बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन शौचालयांमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होणार असून शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल. स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले.

यांची होती उपस्थिती
भूमिपूजन कार्यक्रमाला भाजप गटनेते युवराज लोणारी, आरोग्य सभापती मेघा वाणी, शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, बालकल्याण समिती सभापती शोभा इंगळे, बांधकाम सभापती अनिता सपकाळे, पाणीपुरवठा सभापती महिमा नगराणी, शारदा धांडे, सुजित भोळे, विशाल नाटकर, पूनम बोरोले, सोनम इंगळे, बोधराज चौधरी, गिरीश महाजन, नितीन धांडे, आशिष पटेल, विकास सातदिवे, मुकेश पाटील, बबलू बर्‍हाटे, दीपक धांडे, मनोज बियाणी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, निक्की बत्रा, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, युवा अध्यक्ष संकल्प वाणी यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !