श्री विठ्ठल नामाच्या गजरात भुसावळातून विशेष रेल्वे पंढरपूरला रवाना
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखवला गाडीला हिरवा झेंडा
भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2025) : श्री विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले शेकडो वारकरी शुक्रवार, 24 रोजी विशेष रेल्वेने पंढरपूर रवाना झाले. मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वेद्वारे जळगावसह बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. दरवर्षी मंत्री खडसे यांच्या माध्यमातून पंढरपूर वारीचे आयोजन केले जाते.
मंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी
विशेष गाडी क्रमांक 01159 पंढरपूरला रवाना होण्यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरातून भाविकांनी दिंडी काढली. यात मंत्री रक्षा खडसे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी सहभागी झाल्या. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मंत्री खडसे व भुसावळ विभागाचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रवीण कुमार पाठक यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले.
उद्या परतीचा प्रवास
भुसावळहून निघालेली विशेष आषाढी रेल्वे गाडी शनिवार, 25 रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे दाखल होईल तर शनिवारी रात्री 10.30 वाजता पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला ही गाडी निघाल्यानंतर रविवार, 26 रोजी भुसावळात दाखल होईल.
मंत्री खडसे यांच्या खर्चातून विशेष ट्रेन
अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यामार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली. ही सुविधा वारकर्यांसाठी मोफत आहे. यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणार्या वारकर्यांशी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, नगरसेवक पिंटू कोठारी, भाजपा पदाधिकारी परीक्षीत बर्हाटे, भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, मुरलीधर (गोलू) पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, झेडआरयूसीसी सदस्य, स्थानक व्यवस्थापक, मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.



