भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात
भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : शहरातील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळेची माजी विद्यार्थिनी सुरेखा भंगाळे (विवाहानंतर स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन 2012 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येते. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी नगरपरिषद शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र आवटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पुण्यातील सुधाकर नारखेडे, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने, सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. यावेळी सुधाकर नारखेडे यांनी मागील 14 वर्षांपासून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यामागील उद्देश व प्रेरणा स्पष्ट केली.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणार्या रोशनी विशाल परदेशी हिला 1,501 रुपयांचा धनादेश प्रमुख अतिथी सुधाकर नारखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक मिळविणार्या आशिष विजय जाधव याला 1,100 रुपयांचा धनादेश शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र आवटे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुधाकर नारखेडे यांना पत्नीच्या आठवणीने भावुक होऊन अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांचे वातावरण भारावून गेले.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र आवटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. यश एका दिवसात मिळत नाही; त्यासाठी सातत्य, शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रथम क्रमांक मिळविता न आलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिक जोमाने प्रयत्न करावेत, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी मनोगत व्यक्त करून सुधाकर नारखेडे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले.



