भुसावळातील वीटभट्टी कामगारांच्या 21 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी बाजारतर्फे सामाजिक बांधिलकी जपत नगरपालिका शाळा क्रमांक जुना सातारा, भुसावळ येथे शिक्षण घेणार्या वीटभट्टी कामगारांच्या 21 मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, ‘बालमित्र’ पुस्तके, क्रेयॉन्स कलर्स, पेन्सिल, शार्पनर, रबर, पट्टी, पाऊच तसेच मिठाई व चॉकलेट यांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व उत्साहपूर्ण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रकल्पासाठी मंत्री संजय सावकारे यांनी शालेय बॅगांचे प्रायोजकत्व स्वीकारले. रेवती मांडे व मोना भंगाळे यांनी बालमित्र पुस्तके, वह्या, स्टेशनरी साहित्य मिठाई व चॉकलेट व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. या दोघींनी या उपक्रमाच्या प्रकल्प अध्यक्षा म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी क्लबच्या अध्यक्ष योगीता वायकोळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मनापासून अभ्यास करण्याचा संदेश दिला. प्रसंगी सचिव कविता पाचपांडे, सुनीता पाचपांडे, सीमा सोनार, किरण पोलाडिया, विनीता नेवे व रुपाली राजपूत उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे वीटभट्टी कामगारांच्या 21 मुलांच्या चेहर्यावर आनंद फुलला. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यावेळी व्यक्त करण्यात आला.