भुसावळ गुड्स शेडमधून पहिल्यांदाच वाहनांची रेल्वे वाहतूक : मध्य रेल्वेचा मालवाहतुकीत नवा टप्पा गाठला
100 ऑटोमोबाईल्ससह पहिली ‘एनएमजी’ रॅक रवाना : 14.82 लाखांचे उत्पन्न, व्यवसायवृद्धीला चालना
भुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मालवाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत भुसावळ येथील गुड्स शेडमधून पहिल्यांदाच ऑटोमोबाईल (वाहने) वाहतुकीची यशस्वी सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे मालवाहतुकीचा एक नवीन स्रोत उपलब्ध झाला असून, ग्राहक-केंद्रित लॉजिस्टिक्स सेवा आणि व्यवसायातील वैविध्य वाढवण्याच्या दृष्टीने ही मोठी झेप मानली जात आहे.

भुसावळ गुड्स शेडमधून ‘मेसर्स महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, नाशिक’ या कंपनीसाठी ऑटोमोबाईल लोडिंगची प्रक्रिया यशस्वीरित्या राबविण्यात आली. या माध्यमातून रेल्वेच्या मालवाहतूक व्यवसायात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. जुलै 2027 मध्ये नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची क्षमता वाढवणे आणि विद्यमान ऑटोमोबाईल वाहतूक टिकवून ठेवणे, तसेच तिचा विस्तार करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
24 जुलै 2026 रोजी भुसावळ गुड्स शेडमधून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागातील निडवंडा स्थानकाकडे 25 ‘एनएमजी’ (न्यू मॉडिफाइड गुड्स) वॅगन्समध्ये 100 ऑटोमोबाईल्सची पहिली रॅक यशस्वीरित्या रवाना करण्यात आली. या ऐतिहासिक लोडिंगमधून रेल्वेला 14.82 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, हा महसूलवाढीचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या यशामागे भुसावळ विभागातील ‘बिझनेस डेव्हलपमेंट युनिट’चे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. नवीन ग्राहक शोधणे, त्यांच्या गरजेनुसार सेवा उपलब्ध करून देणे आणि मालवाहतुकीच्या नव्या संधी निर्माण करणे या दिशेने विभागाने प्रभावी कामगिरी बजावली आहे.
भुसावळ विभागातून वाहनांची रेल्वेमार्फत वाहतूक सुरू होणे म्हणजे मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वैविध्य आणण्याच्या धोरणाला मिळालेला ठोस आधार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होत आहेत. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून रेल्वे वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या राष्ट्रीय धोरणालाही यामुळे बळकटी मिळणार आहे.
ही उपलब्धी रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्स प्रणाली अधिक मजबूत करण्यास, पायाभूत सुविधांचा विकास गतीमान करण्यास आणि दीर्घकालीन महसूलवाढ साध्य करण्यास उपयुक्त ठरणार आहे. भारतीय रेल्वेच्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाशी सुसंगत राहून बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्याच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे नवे बळ मिळाले आहे.
एकूणच, भुसावळ गुड्स शेडमधून सुरू झालेली ही ऑटोमोबाईल वाहतूक सेवा मध्य रेल्वेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची साक्ष देणारी असून, भविष्यात मालवाहतूक क्षेत्रात आणखी विस्तार आणि उत्पन्नवाढीसाठी नवे मार्ग खुले करणार असल्याचे चित्र आहे.