अग्रवाल समाज संघटन बळकटीवर भर : भुसावळात जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेची बैठक उत्साहात


भुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026) : जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी सकाळी 11 वाजता तापी स्टील येथे उद्योजक महेंद्र अग्रवाल यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत समाज संघटन बळकट करण्यावर भर देत विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश अग्रवाल होते. व्यासपीठावर चेअरमन पवन मित्तल, गोपाल अग्रवाल (बोदवड), संजय अग्रवाल (भुसावळ), शेंदुर्णी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, महामंत्री रोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अग्रवाल समाजाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तालुकास्तरावर युवा व महिला मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विवाह जुळविताना जिल्ह्यातीलच समाजबांधवांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी अग्रसेन जयंतीनिमित्त तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले.

याशिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे परिचय संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील वकील, डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट यांची स्वतंत्र माहिती संकलित करून यादी तयार करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीस संतोष अग्रवाल (चोपडा), सिताराम अग्रवाल (पाचोरा), कैलास अग्रवाल (कासोदा), राजेश अग्रवाल (शेंदुर्णी), नंदकिशोर अग्रवाल (फैजपूर), सुभाषचंद्र अग्रवाल (बेलसवाडी), राजेश अग्रवाल (भुसावळ), नरेंद्र अग्रवाल, सतीश अग्रवाल, श्याम सामरिया, नवल मित्तल, निकेश अग्रवाल, आशिष अग्रवाल, संजय सिंहल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांचा सत्कार
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याबद्दल गोविंद अग्रवाल यांचा भुसावळ अग्रवाल समाजातर्फे बैठकीदरम्यान विशेष सत्कार करण्यात आला.

महेंद्र अग्रवाल यांनाही सन्मान
अंबुजा सिमेंटतर्फे नाशिक स्तरावरील ‘उत्कृष्ट उद्योजक’ सन्मान प्राप्त झाल्याबद्दल तापी स्टीलचे संचालक महेंद्र अग्रवाल यांचा जिल्ह्यातील समाज बांधवांनी महाराजा अग्रसेन यांच्या मूर्ती देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन रवी अग्रवाल यांनी केले.

सामाजिक मागण्यांवरही चर्चा
समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना आई-वडिलांची परवानगी अनिवार्य करण्यासाठी शासनाने कायदा करावा, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच सुरू असलेल्या एस.आय.आर. नोंदणी प्रक्रियेत अग्रवाल समाजातील सर्व बांधवांनी प्राधान्याने सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !