भुसावळातील 12 हजार लोकसंख्येच्या प्रभागासाठी अवघे पाच सफाई कर्मचारी : भाजपा नगरसेविकेची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

नगरसेवकांच्या दबावातून कर्मचारी कमी केल्याचा दावा : सर्वाधिक क्षेत्रफळ व सुमारे 12 हजार 500 लोकसंख्या असलेल्या प्रभागात अपुरे मनुष्यबळ


भुसावळ (बुधवार, 29 जुलै 2026) : भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 25 मधील सफाई कर्मचार्‍यांची संख्या नगरसेवकांच्या दबावातून अन्यायकारक पद्धतीने कमी करण्यात आल्याचा आरोप करत नगरसेविका डॉ.छाया मु. फालक (देशमुख) यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे मंगळवारी लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या प्रमाणात सफाई कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सर्वाधिक लोकसंख्या मात्र अल्प कर्मचारी
निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 25 हा भुसावळ शहरातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या प्रभागांपैकी एक आहे शिवाय या प्रभागाची लोकसंख्या सुमारे 12 हजार 500 आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी आणि विस्तीर्ण क्षेत्रासाठी केवळ पाच सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा नगरसेविका फालक यांनी केला आहे. आहे.

शहरातील काही इतर प्रभागांमध्ये सुमारे 6,000 लोकसंख्या असतानाही 18 ते 20 सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे कर्मचारी वाटपात स्पष्ट विसंगती असून प्रभाग क्रमांक 25 वर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अपूर्ण मनुष्यबळामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा साचत असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर कर्मचारी वाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच प्रभागाच्या लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात आवश्यक तेवढे सफाई कर्मचारी तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !