गुन्हेगारी टोळ्यांमुळे कुप्रसिद्ध जामदेत पोलिसांचे कोम्बिंग : लाखाची रोकड, पाच किलो चांदीसह दोन वॉण्टेड व 25 संशयीत जाळ्यात
धुळे जिल्हा पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : 43 दुचाकींसह दोन कार जप्त
गणेश वाघ
धुळे (बुधवार, 29 जुलै 2026) : स्वस्तातील कॉपरसह स्क्रॅप देण्याच्या भूलथापा देत व्यापार्यांना लुटणार्या टोळ्यांनी धुळे जिल्ह्यातील निजामपूर हद्दीतील जामदे परिसरात उच्छाद मांडला होता. चोरी, जबरी चोरीसारख्या घटना सातत्याने होत असल्याने गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी धडक मोहिम राबवत बुधवारी मध्यरात्रीपासून कोम्बिंग राबवले. एकाचवेळी विविध पथकाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेतला. यावेळी 25 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले तर दोन वॉण्टेड आरोपींना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींच्या घर झडतीतून 97 हजार सातशे रुपयांची रोकड, 4.80 किलो चांदी तसेच 43 दुचाकी व दोन कार जप्त करण्यात आल्या. अचानक झालेल्या कारवाईनंतर गुन्हेगारी गोटात प्रचंड खळबळ उडाली तर सर्वसामान्य जनतेने या कारवाईचे स्वागत केले.

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक ओंकार गवळी यांच्या नेतृत्वात धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात कारवाईचे नियोजन करण्यात आले. ऑपरेशनदरम्यान ड्रोनच्या साहाय्याने गावातील संवेदनशील भागांची पाहणी करून भौगोलिक माहिती संकलित करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेपासून सुरू झालेली मोहिम पहाटेपर्यंत राबवण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
17 अधिकार्यांचा सहभाग
या विशेष कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा, निजामपूर पोलीस ठाणे, धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर, मोहाडीनगर तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा 17 पोलीस अधिकारी आणि 190 अंमलदार सहभागी झाले. यापूर्वी करण्यात आलेल्या गोपनीय माहिती संकलनाच्या आधारे ही मोहीम आखण्यात आली होती.
टोळ्यांचा वाढला होता उच्छाद
जामदे गावातील काही टोळ्या परिसरात चोरी, जबरी चोरी आणि दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्क्रॅप व कॉपर स्वस्तात विक्री करण्याच्या बहाण्याने गुजरात, इंदूर आणि मुंबई येथील व्यापार्यांना गावात बोलावून त्यांची लूट केल्याचे प्रकारही घडल्याने या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा या उद्देशाने कोम्बिंग व सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. मध्यरात्री अचानक गावाला चारही बाजूंनी घेराव घालून पोलिसांनी घराघरांची झडती घेतली. फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात आला. गावातील प्रमुख रस्त्यांवर कडक नाकाबंदी करण्यात आली. दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करून विनाकागदपत्रे व संशयित वाहने जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अशी झाली कारवाई
रोकड जप्त- 97,700
चांदी – 4.80 किलो
मोबाईल- 18
लॅपटॉप- 2
दुचाकी वाहने- 43
चारचाकी वाहने- 2
पाहिजे महिला आरोपी- दोघांना अटक
संशयित ताब्यात- 25
यांचा कारवाईत सहभाग
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक ओंकार गवळी, धुळे ग्रामीण उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, धुळे तालुका निरीक्षक धनंजय पाटील, साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी, मोहाडी निरीक्षक शिल्पा पाटील, राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले, निजामपूरचे सहा.निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेरचे सहा.निरीक्षक नामदेव सहारे, शिंदखेडा सहा.निरीक्षक मयुर भामरे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे व पोलीस उपनिरीक्षक अमित माळी आदींच्या पथकाने केली.