समस्या सोडवताना शिक्षकांचे पाठबळ आवश्यक : भुसावळात शिक्षक आमदार किशोर दराडे
के.नारखेडे विद्यालयात शिक्षक आमदार निधीतून प्रोजेक्टर भेट
भुसावळ (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : समस्या सोडवत असतांना शिक्षकांचे पाठबळ असणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यास निश्चितच आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही भुसावळात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली. शहरातील के. नारखेडे विद्यालयाला शुक्रवार, 31 रोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिली.

विद्यालयात प्रोजेक्टर भेट
आमदार निधीतून के.नारखेडे विद्यालयाला प्रोजेक्टर भेट देण्यात आला. शिक्षक नेते संभाजी पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी हरीश मुंडे, रवींद्र चव्हाण, महेंद्र पवार, प्रवीण लहरे, तुळशीराम सोनवणे, इत्यादी मान्यवर सुद्धा उपस्थित होते.
आमदार दराडे यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी इतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांनी त्यांना असलेल्या समस्या आमदारांच्या समोर मांडल्या. आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी. पाठक यांनी तर सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक एस.पी.महाजन यांनी केले.
पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील जेष्ठ क्लर्क मंगेश पाटील, संगणक विभागासह विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.