अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त भुसावळातील म्युनिसीपल हायस्कूलमध्ये अभिवादन


भुसावळ (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनवर आदरांजलीचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने होते.

थोर महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन
मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस तर सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरला सावकारे, संध्या धांडे, डॉ.प्रदीप साखरे व संजीव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक परिवर्तनातील योगदान तसेच श्रमिक व वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे हे समाजजागृती करणारे क्रांतिकारी साहित्यिक तर लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. या दोन्ही महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांच्या आदर्शांचा जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ.प्रदीप साखरे, वरिष्ठ लिपिक प्रविण चौधरी, ग्रंथपाल अरुण नेटके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.एच.राठोड यांनी तर आभार पूनम देवकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डी.के.भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल व रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !