गुरुपौर्णिमेनिमित्त खिर्डीत हजारो भाविकांचे देवपूजा वंदन
महानुभाव संप्रदायाची 800 वर्षांची आगळीवेगळी परंपरा आजही अखंड
खिर्डी, ता.रावेर (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : गुरुपौर्णिमेनिमित्त रावेर तालुक्यातील खिर्डी येथे महानुभाव संप्रदायाच्या देवपूजा वंदन उत्सवाला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दर्शनाचा लाभ घेतला. आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत चालणार्या या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांनी परमपवित्र देवपूजा, प्रसाद व श्रीमूर्तींचे श्रद्धाभावाने वंदन केले.

महानुभाव संप्रदायाची सुमारे 800 वर्षांची अखंड परंपरा आजही जपली जात आहे. परमेश्वराच्या श्रीचरणस्पर्शाने पावन झालेल्या श्रीमूर्ती, वस्त्रे, प्रसाद व पवित्र पाषाण अत्यंत सुरक्षितपणे जतन करण्यात आले आहेत. या दुर्मिळ देवपूजेचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या कालावधीत राज्यभरातील भाविक विविध मठ, मंदिरे व आश्रमांना भेट देतात.
मुंबई, गोंदिया, लातूर, नंदुरबार, चंद्रपूर, सातारासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो भाविकांनी खिर्डी येथे उपस्थित राहून देवपूजा वंदन केले. संत, महंत, त्यागी, तपस्वी व साधकांनी परमेश्वर अवताराशी संबंधित पवित्र वस्तूंचे शतकानुशतके जतन करून ही आध्यात्मिक परंपरा अखंड ठेवली असल्याची माहिती खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिराचे गादीपती चोरमांगे मोठेबाबा यांनी दिली.
800 वर्षांपूर्वीच्या श्रीकृष्ण मूर्तीचे भाविकांना दर्शन
खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानात महानुभाव पंथातील चौथे अवतार, आरसा विशेष, गुजरात राज्यातील संगम रवरी पाषाणातील श्रीचक्रधर स्वामींची भव्य मूर्ती, तसेच वज्री घडवणे आणि पिवळे तळोली यांसारख्या पवित्र प्रसादांचे भाविकांना वंदन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
दिवसभर विविध प्रकारच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शन घेऊन आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत प्रसादाचा लाभ घेतला.